










पोलादपूरचे दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल आता झालेय अकार्यान्वित!
'बहुउद्देशिय संकूल' होण्याचे संकेत
शैलेश पालकर
दि लेप्रसी मिशनचे कार्य भारतात १८७४ मध्ये सुरू झाले. देशभरात १८ हॉस्पिटल असलेल्या दि लेप्रसी मिशनचे पोलादपूर येथील हॉस्पिटल मात्र, पूर्वीच्या महारोगी आश्रमाचे सद्यरूप आहे. जुलै महिन्यामध्ये या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमधील पेशन्टस्ना मिरज येथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे हॉस्पिटल अकार्यान्विंत होणार असल्याची कुजबूज पोलादपूरकरांच्या कानावर येत आहे. आता हा परिसर भकास झाला आहे. दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे पुढे काय होणार, या प्रश्नाला येथे बहुउद्देशिय संकुल होणार असल्याची माहिती दिली जात आहे. परंतु यापूर्वीच मुंबई ते गोवा नॅशनल हायवेलगतची जमीन विकली गेल्याने तालुक्यात साशंकता व्यक्त होत आहे.पूर्वेतिहास- महारोगी आश्रमाचापोलादपूर -महाबळेश्वर रस्त्यालगत (तत्कालीन जुना महाबळेश्वर रस्ता) फिटझ्गेराल्ड घाटाकडे (आताचा आंबेनळी घाट) जाताना गावाबाहेर छोटया बांबू आणि पानांनी शाकारलेल्या कुडाच्या भिंती असलेल्या अर्धा डझनभर झोपडयांचे अस्तित्वच सांगत होते की, त्यांच्याजवळ कोणी फिरकतही नसेल. तेथेच मोकळया मैदानावर १२-१५ विछिन्न गरीब मानवांचा एक घोळका बसलेला दिसत होता. त्यांना कुष्ठरोग झाल्याचे बिनचूकपणे सांगता येत होते. तेव्हा त्यांची हरिपंत केळकर नावाचे शिक्षक मानवतेच्या भावनेतून करीत असलेली सेवा आणि त्यांच्या चरितार्थाची याबाबत माहिती मिळाली. केळकरदेखील तेथेच असल्याचे दिसून आले. हे ठिकाण उत्तर आणि दक्षिण कोकणात जाणा-या रस्त्याचे मध्यवर्ती तर महाबळेश्वर आणि दख्खनच्या पठाराकडे जाणा-या रस्त्याचे कोकणातील प्रवेशद्वार असल्याने गरीब कुष्ठरोग्यांना भिक्षेकरी म्हणून खुपच चांगले होते. रस्ता बैलगाडीच्या रहदारीचा होता. येथून प्रवासी आणि अनेक प्रकारच्या मालाची वाहतूक होत असे. मीठ, तांदूळ, नारळ, सुकी मासळी, मातीची आणि धातूची भांडी खुपशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू असताना हे भिक्षेकरी कुष्ठरोगी चांगल्या भिक्षेच्या अपेक्षेत रस्त्याच्या बाजूला बसून प्रयत्न करीत असत.हरिपंतांनी कुष्ठरूग्णांच्या मदतीने त्यांची निवासाची व्यवस्था केली. त्यांना त्यासाठी कोणतेही पाठबळ नव्हते. मानवसेवेवरील विश्वास आणि या गरीब अस्पृश्यांबाबतचे प्रेम ही त्यांची शिदोरी होती. यामुळे पोलादपूरचे किराणा व्यापारी आणि दुकानदार मात्र, हरिपंतांच्या कार्याची अशासाठी प्रशंसा करीत होते कारण या महारोग्यांना (तत्कालीन कुष्ठरूग्णांचा उल्लेख) गावात भररस्त्यावर फिरण्यापासून हरिपंतांनी परावृत्त केले. प्रशंसेसोबत ते हरिपंतांना मदतही करीत असत. केळकर हे गावात शाळा चालविण्यासोबतच हा आश्रमही चालवित होते, असा उल्लेख हरिपंत गोविंद केळकर या ख्रिश्चन धर्मांतरीत ब्राह्मण म्हणून स्वत:चा चरितार्थ दक्षिणा व भिक्षा मागून करणा-याच्या कुष्ठरोगी म्हणजेच महारोगी आश्रमाबाबत माहिती देताना स्कॉटलंडच्या युनायटेड फ्रि चर्चचे रेव्हरंड विल्की ब्राऊन महाबळेश्वर येथील इंग्लिश स्कूलकडे जाताना १८९५ मध्ये दिलेल्या भेटीनंतर लिहिली आहे. याचा संदर्भ ए.डोनाल्ड मिलर यांच्या लंडन येथे दि मिशन टू लेपर, ऍन इन्न कॉल्ड वेलकम या लेखनामध्ये १९६५ साली आढळून आला आहे. २० व्या शतकात १९१२ मध्ये या महारोगी आश्रमाचे स्वरूप बदलले. हरिपंत या कार्यापासून दूर झाले तरीही कुष्ठरोगींवरील उपचार सुरू ठेवण्यासाठी स्कॉटलंडच्या फॉरेन मिशन कमिटीज ऑफ चर्चच्या अधिपत्याखाली आणि मिशन टू लेपरच्या अर्थपुरवठयावर येथे हॉस्पिटलचे स्वरूप आले. १९४० च्या दरम्यान १८० लेप्रसी पेशंटस् होते. १९४३ मध्ये डॉ.व्हिक्टर दास यांनी निवासी डॉक्टर म्हणून कामास सुरूवात केली. पूर्वी कुष्ठरूग्णांनी बांधलेल्या छोटया चर्चचे १९५४ मध्ये रेव्हरंड डोनाल्ड मिचेल आणि हरिपंत केळकर यांच्या स्मरणार्थ नव्या चर्चमध्ये रूपांतर झाले. १९५९ मध्ये सध्याच्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे स्वरूप पूर्णत्वास आले. दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलने अलिकडेच कुष्ठरोग दूरीकरणासाठी तसेच बरा होणारा सर्वसामान्य रोग असे स्वरूप आणण्यासाठी भारतात बाराबंकी, बेळगांव, चम्पा, चंदखुरी, दयापुरम, फैझाबाद, कोलकता, कोथारा, मिरज, मुझफ्फरपूर, नैनी, शहाद्रा, वडाथोरासालूर,पुरूलिया, सालूर, रामचंद्रपुरम, सालडोहा, पोलादपूर व सालूर अशा १८ हॉस्पिटलमध्ये इंटिग्रेशनसाठी कुष्ठरूग्णांप्रमाणेच बाह्यरूग्णांवरही उपचार सुरू केले. यासोबतच आरोग्याची काळजी, कुष्ठरोगाबाबत शिक्षण, पुनर्वसन व प्रशिक्षण, सर्वसामान्यांचे कुष्ठरूग्णांच्या अपंगत्वाबाबत प्रबोधन तसेच कुष्ठरूग्णांच्या पाल्यांना सर्वसामान्यांप्रमाणेच जगण्याची संधी देण्याचे प्रयत्न दि लेप्रसी मिशनतर्फे सुरू करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री ना.अशोक चव्हाण यांनी आगामी २०११ वर्ष पर्यटन वर्ष असल्याचे जाहिर केले आहे. याअनुषंगाने पोलादपूर येथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा परिसर आता तेथे कुष्ठरोग निर्मूलनाचे प्रयत्न होत नसल्याने निर्मनुष्य झाला असल्याने तेथे बहुउद्देशिय संकूल सुरू करण्याचा मानस मिशनच्या संचालकांनी घेतल्याची चर्चा आहे. मिशनची मुंबई ते गोवा नॅशनल हायवेलगतच्या जमिनीची विक्री झाल्यानंतर या हॉस्पिटलच्या परिसराबाबतही असाच प्रकार होण्याची साशंकता पोलादपूरवासियांमध्ये आहे. त्यामुळे टीएलएमचे बहुउद्देशिय संकूल आगामी पर्यटनवर्षाच्या पूर्वीच व्हावे, अशाप्रकारची कार्यवाही संचालक मंडळासह राज्यसरकारने करण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलादपूर तालुक्याचे पहिले जागतिकीकरणाचे द्योतक म्हणजे दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल, इंडिया हे नुकतेच बंद झाले आहे. सध्या मिरजच्या मिशनरी हॉस्पिटलकडे कारभार सोपविण्यात आला आहे. येथे ओपीडी, जनरल वार्ड, ७ कर्मचारी निवासस्थाने, शाळा, दोन जुन्या पेशन्टच्या खोल्या, डोंगरालगतचे कर्मचारीवर्गाचे बंगले, चर्च, शाळागृह अशा इमारती, वातानुकूलन, पाणी, जनरेटर, बाग-बगिचे अशा सर्व सुविधा सुमारे २२ एकर परिसरामध्ये उपलब्ध आहेत. राज्यसरकारने या संकूलाची विक्री होण्यापूर्वीच प्रतिबंध करून पर्यटकांच्या निवासाची सुविधा करण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पर्यटक येथे निवास करून तालुक्यातील तसेच महाबळेश्वरसह कोकणातील पर्यटनस्थळांना भेट देऊ शकतील.दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल,पोलादपूरच्या मुंबई ते गोवा नॅशनल हायवेलगतच्या ८.७ एकर जमिनीची मागणी विधानपरिषदेचे आमदार व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिल्यांदा चेअरमन झाल्यानंतर पोलादपूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयावर १९९८साली महामोर्चा नेल्यानंतर केली होती. त्यावेळी तेथे मेडीकल कॉलेज, अपघात उपचार हॉस्पिटल, रायगड बाजार आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असे एकत्रित संकूल उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. यावेळी लेप्रसी हॉस्पिटलच्या सूत्रांनी कुलाबा (सध्याचा रायगड) जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी या हॉस्पिटलला भेट देऊन १२५ रूपयांची देणगी दिल्याची आठवण सांगून या देणगीतून कुष्ठरूग्णांसाठी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या जमिनीवर भातशेती पिकवून तसेच कलमी आंब्यांचे पिक घेऊन हॉस्पिटलला उत्पन्न मिळत असे. मात्र, ज्या जमिनीची मागणी आ.जयंत पाटील यांनी केली होती. ती जमीन दोन वर्षांपूर्वी खासगीरित्या विकण्यात आली. १९७८ च्या सुमारास पोलादपूरचे मार्गदर्शक डॉ.काका करमरकर यांनी या लेप्रसी मिशन हॉस्पिटल परिसराला त्यांच्या विधायक मानवतावादी कार्यासाठी घरपट्टी कायम माफ करण्याचा ठराव केला. त्याशिवाय दिवबत्ती आणि स्वच्छताविषयक कामेही ग्रामपंचायतीमार्फत करण्याचे ठरले होते. त्यानुसार आजपर्यंत पोलादपूर ग्रामपंचायत या सुविधा विनाकरआकारणीने देत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय व धार्मिक सणासुदीला तसेच विविध राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूरकर दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमधील कुष्ठरूग्णांना मिठाईवाटप करीत आहेत. अलिकडेच ग्रामपंचायतीने एका ठरावाद्वारे गावठाण विस्तारासाठी प्राधान्याने दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलच्या ताब्यात असलेल्या २२ एकर जमिनीपैकी महाबळेश्वर रस्त्यालगतची काही जमीन उपलब्ध झाल्यास गावाचा सीमाविस्तार शक्य असल्याचे नमूद केले आहे. जुलै २०१० मध्ये येथील कुष्ठरूग्णांना अचानक मिरजच्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून संचालक असलेल्या दास यांच्याकडे काही निवृत्त कर्मचा-यांनी किमान येथील चर्चतरी प्रार्थनेसाठी खुले राहावे अशी मागणी केली आहे.येत्या नोव्हेंबरपर्यंत या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे बहुउद्देशिय संकूलात रूपांतर होण्याचे संकेत संचालकांकडून प्राप्त झाले आहेत. . मात्र, तसेच न झाल्यास काहींनी येथील जमिनीच्या खरेदीसाठी 'ऑफर्स' दिल्याचीही चर्चा आहे. जागृत पोलादपूरकरही एकूण प्रकाराबाबत गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. दिल्लीतील दि लेप्रसी मिशनचे संचालक याबाबत निर्णय घेत असल्याने कोणासही काही माहिती नाही. धर्मादाय स्वरूपात सुरू झालेल्या पोलादपूरच्या हरिपंत गोविंद केळकर यांच्या महारोगी आश्रमाचे दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता पुढे काय होणार, या प्रश्नचिन्हाचे उत्तर आगामी पर्यटनवर्षानिमित्त राज्यसरकारनेच शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment